Pages

Wednesday, December 27, 2017

अनुष्का आणि साया बरोबर शिकलेल्या गोष्टी - Toilet Fight

भावंडांमध्ये भांडणे झाली नाहीत असे होणे शक्यच नाही. छोट्या छोट्या अनेक कारणांसाठी भांडणे. लहानपणी मी आणि माझ्या बहिणीने अनेक छोट्या छोट्या भांडणांमध्ये तास अन तास खर्ची घातले आहेत आणि त्यावरून बोलणी पण खाल्ली आहेत. माझी आजी  कधी म्हणाली की किती भांडता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून, की मी लगेच म्हणायचो की असेच छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करावे. त्याने बरे वाटते. भांडणाची खूमखूमी कमी होते आणि काही फारसे नुकसान पण होत नाही. नाहीतर भावंडं वर्षानुवर्ष कोर्ट मध्ये भांडतात त्यात काय मजा? तर असो. 

अनुष्का आणि साया पण ह्याला अपवाद नाहीत. "ती मला असा का म्हणाली,  तिने मला का चिडवले, तिने मला बोट का लावले, तिने माझा सॉक्स का पळवला " ह्या मुद्यांकडे मी तर सरळ दुर्लक्ष करतो (म्हणजे फारच बायकोचा आरडाओरडा झाला तर जाऊन जरा ओरडल्यासारखे करतो पण मी आणि मुली ते काही फार सिरिअसली घेत नाही). पण ह्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी हताश होतो. ती म्हणजे बाथरूम ला पहिले कोण जाणार ह्याची fight. 

घरात ३ बाथरूम आहेत. सर्व सारख्याच स्वच्छ आणि चकचकीत आहेत. कोणत्याही बाथरूम मध्ये जाण्यासाठी मी वेगळे तिकीट चार्जे करतो असे नाही. हे काही सुलभ शौचालय नाही की एक रुपया टाकून आपल्या नंबर साठी तलवार काढावी. पण तरीही ह्याच्यासाठी रोज भांडण. आता बाथरूम ला सर्वांना एकदम जावे लागते अशीही  काही परिस्थिती नसते पण अनुष्का कधीही म्हणाली की मी बाथरूम ला जाते की साया हातातले काम टाकून मी आधी जाणार म्हणून येणारच. त्यानंतर दोघींपैकी कोणीतरी कोणत्या बाथरूम मध्ये जायचे ते ठरवणार आणि मग युद्धाला सुरुवात. अनेकदा ठरवलेली बाथरूम जगाच्या दुसऱ्या टोकाला असणार, मग मधले अडथळे ओलांडीत, तुडवीत दोघीही पळणार. जिन्यामध्ये ढकलाढकली करणार. एकमेकींचे केस ओढणार. बाथरूम चे दार ढकलत मारामारी करणार. आता कोणीतरी एकजणच एका वेळेस जाऊ शकणार मग हरलेली पार्टी रडारड करणार. जिंकलेली पार्टी आनंदात आपले काम उरकण्यापेक्षा धापा टाकत बसणार. मनात कुठेतरी guilt feeling असणार. वगैरे वगैरे. मग आमचे आवाज चढणार, आरडा ओरडा होणार. मी बायको वर आणि बायको माझ्यावर चिडणार (कारण मी proactively भांडणे का मिटवली नाहीत असा बायकोचा साधा हिशोब आणि मला १० कामे आहेत. ते सर्व सोडून आता टॉयलेट ट्रीटी मध्ये माझा वेळ घालवू का असा माझा सरळ हिशोब. )

इतकं सर्व करून मुलींना काय मिळाले ह्याचा मी अनेकदा विचार केला आहे. पहिल्यांदा बाथरूम पकडणाऱ्याला मी काही "बाथरूम चा राजा " किंवा "टॉयलेटकेसरी " असा 'किताब देणार नसतो. महिन्यात जास्तीतजास्त वेळा पाहिलांदा बाथरूम मध्ये कोण गेले ह्यासाठी मी काही बक्षीसही  ठेवलेले नसते. पहिल्यांदा बाथरूम मध्ये गेलेली मुलगी आवडती आणि बाहेर राहिली ती नावडती असेही काही नसते. किंबहुना अश्या fight नंतर दोघी मुली ओरडूनच घेतात. मग सर्वस्व पणाला लावून टॉयलेटभूषण बनण्याची ही कसली आवड? आणि मग लक्षात आले की ही टॉयलेट fight तर सर्वत्रच दिसते आहे.

सकाळी झोपेतून उठले आणि whatsapp चेक केले की काही जण "A" चांगला का "B" ह्यावर भांडत असणार. हे "A" आणि "B" राजकारण, सिनेमा, धर्म वगैरे वगैरे काहीही असणार. पाने च्या पाने वाया जाणार, इंटरनेट कचरा तयार होणार, आणि का? तर काही कारण नाही. General Toilet Fight .

घरातून निघून रस्त्यावर जावे तर सर्वजण race मध्ये असणार. सिग्नल वरून कोण पहिला निघतो त्यावरून fight.

फर्स्ट डे फर्स्ट शो नाही बघितला तर जग आपल्याला backward म्हणणार ह्या भीतीने केलेला लढा

ऑफिस मध्ये मी सर्वात उशिरा निघतो (उगाचच) आणि म्हणून मीच सर्वात जास्त hardworking हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न.

खूप भारी फोन येणार आणि तो घेतला नाही तर माणसांमधील संवादच संपणार अश्या उदात्त भावनेने आपल्याला परवडत नसून रात्र रात्र रांगेत उभे राहण्याचा आग्रह.

यादी संपणार नाही. वाचणारा प्रत्येक जण अजून १० तरी ऍडिशन्स करेल.  

थोडक्यात म्हणजे धावा, अजून जोरात धावा, Social Media वरचे आभासी ससे race जिंकत आले आहेत त्यांना मागे टाकलेच पाहिजे. ह्या जगात राहण्यासाठी अजून जोरात धावले पाहिजे.

मला वाटते ह्या सर्व आपल्या आयुष्यातल्या Toilet Fights आहेत. ह्या वाटेने पुढे गेले तर टॉयलेटशिरोमणी हा 'किताब सोडून दुसरे काही मिळेल असे वाटत नाही. 

Saturday, October 8, 2011

अनुष्का कडून शिकलेल्या गोष्टी. - Part ३

अनुष्का कडून शिकलेल्या गोष्टी.  - Part  ३

आणि अनुष्का चा नवीन बेड आला. अनेक दिवसांपासून असलेला एक प्रश्न सुटला. 

नवीन बाळ घरी येणार म्हणून झोपण्याच्या व्यवस्थेत काही तरी बदल करावा लागणारच होता. पण तो बदल कसा करावा हे अनेक दिवस ठरवता येत  नव्हते. प्रथम आम्ही विचार केला की एक बाळासाठी छोटा बेड आणावा. पण तो काही फार दिवस वापरता आला नसता. बाळाला थोडे कळायला लागल्यावर ते काही एकटे एका बेड वर नक्कीच नसते झोपले आणि अनुष्का साठी नवीन बेड घेणे म्हणजे तिला उगाचच वाटत राहिले असते के बाळ  आल्यावर आपण आई बाबा पासून दूर गेलो. आहे तो बेड चार जणांसाठी नक्कीच पुरला नसता. ह्या सर्वातून मार्ग काढण्यासाठी अनुष्कालाच विचारले की तिला दुसऱ्या बेड वर झोपायला आवडेल का? तिला हे पण सांगितले कि तो बेड जरी वेगळा असला तरी तो आपण नेहमीच्या बेड च्या शेजारी ठेवू.

आमची अपेक्षा होती की अनुष्का ला समजवावे लागेल, किंवा बाळ आल्यावर काही दिवस बाळाला नवीन बेड वर झोपवावे लागेल पण ह्या सर्व गोष्टींना छेद देऊन अनुष्का फारच लगेच तयार झाली आणि इतकेच नाही तर त्याची स्वप्न बघू लागली. तिला वोल्ट डिस्ने चे कार्टून्स खूप आवडतात त्यामुळे बेड आल्यावर आपण त्यावर तश्या कार्टून्स ची चादर घालू, बेड सजवू अशा कल्पनांमध्ये रंगून गेली.

शेवटी थोड्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बेड आला आणि अनुष्का फारच खुश झाली. आम्ही बेड नीट लावला आणि त्यावर अनुष्का ला आवडतील अशी चादर, उशी चे कव्हर, रजई घातली आणि अनुष्काला दाखवला. बेड फारच चांगला लागला. लांबून बघितल्यावर तो आमच्याच बेड का एक भाग वाटत होता. तसाच आकार, तशीच उंची त्यामुळे तो वेगळा बेड वाटतच नव्हता. पण तरीही आमचा बेड आणि नवीन बेड ह्यामध्ये अर्धा इंच उंचीचा फरक होता. त्यामुळे जरी तो बेड एकाच वाटत असला तरी अनुष्काचा बेड ला स्वतःचे अस्तित्व होते. 

रात्र झाली. आज अनुष्का त्या बेडवर पहिल्यांदा झोपणार होती. आता बघू ती काय करते अशा विचाराने आम्ही झोपायला गेलो. अनुष्काचा उत्साह तसाच राहिला आणि ती मजेत स्वतःच्या बेड वर झोपून गेली. 
ती झोपल्यावर मला आतिशय चुटपूट लागली. ती नवीन बेड वर झोपू शकेल का ह्याचा विचार करता करता
मी एकटा झोपू शकेन का हा विचार मनात आलाच नव्हता.  अनुष्का रोज आमच्या मध्ये झोपायची, वाटेल तशी लोळायची आणि मला एका कोपऱ्यात ढकलायची ह्या आरामापुढे आज ह्या बेड वर ऐसपैस झोपण्यात मजाच येई ना. मनात विचार आला की तिच्या आणि आमच्या सहजीवनातील एक भाग संपला. अनुष्का थोडी अजून मोठी झाली.

त्या रात्री खूप वेळ झोप लागली नाही. रात्री उशिरा अनुष्का चा आवाज आला. अनुष्का झोपेतच होती आणि मला जवळ घ्यायला सांगत होती. मी हात पुढे केला आणि तिला थोपटले. तिला लगेच झोप लागली.

मनात विचार आला की लांब, जवळ ह्या गोष्टी सापेक्ष आहेत. काळाप्रमाणे, मोठे होण्याच्या प्रोसेस मध्ये लांब जाणे हि गोष्ट अपरिहार्य आहे. पण तरीही काहीही फरक पडत नाही. गरज असेल तेव्हा जवळ हात पोहोचला म्हणजे झाले.


Saturday, June 18, 2011

अनुष्का कडून शिकलेल्या गोष्टी - Part 2

अनुष्का कडून शिकलेल्या गोष्टी -  Part 2
वेळ रात्री साधारण ११.३०. बाबा अनुष्का बरोबर रात्रीचे दुध पिण्यासंबंधी वाटाघाटी करतो आहे. हे आतिशय महत्वाचे आहे कारण बहुतेक वेळा अनुष्का रात्रीचे दुध पिते आणि ते माझ्या हातून पिते. एखाद्या दिवशी माझ्या मीटिंग मुळे जर मी दुध देऊ शकलो नाही तर अनुष्का ते लक्षात ठेऊन जर रात्री तिला जग आली तर मला उठवून मागते. आपली मुलगी कितीही लाडकी असली तरी जर मीटिंग रात्री दीड दोन पर्यंत चालली तर लगेच डोळा लागता लागता अनुष्काने उठवले तर चिडचिड होते त्यामुळे शक्यतो रात्री माझी मीटिंग च्या आधी तिला दुध देण्याचा आमचा प्रयत्न असतो. प्रयत्न अशासाठी कि काही वेळा अनुष्का ला दुध नको असते त्यावेळी तिला ते जबरदस्ती देण्यात काहीच शहाणपणा नसतो. त्यामुळे दुध पिण्यासंबंधी तिच्या बरोबर वाटाघाटी कराव्या लागतात.
बाबा: अनुष्का... तुला दुध हवे आहे का?
अनुष्का: दुध गरम गरम असते. अनुष्का ला ते खूप आवडते. 
बाबा: हो पण तुला ते हवे आहे का आत्ता? का उद्या break fast करता करता पिशील?
अनुष्का: अनुष्का रात्री दुध पिते. दुधात बाबा chocolate घालतो. 
बाबा: Correct . पण तुला दुध आत्ता हवे आहे का? का मी मीटिंग ला जाऊ?
अनुष्का: बाबाची रोज मीटिंग असते. मीटिंग मध्ये बाबा माणसाशी बोलतो. 
:
:
:
:
बाबा: पण तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस. तू दुध पिणार आहेस का आत्ता?
अनुष्का: अनुष्का कप नी दुध पिते. अनुष्का लहान होती तेव्हा बाटलीने दुध प्यायची आता ती बिग girl झाली आहे त्यामुळे ती कप नी  दुध पिते.
माझा patient हळू हळू संपत जातो. दुसऱ्या दिवशी आठ वाजता एका business unit बरोबर महत्वाची मीटिंग आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून आत्ता offshore team बरोबर मीटिंग आहे त्याचे विचार डोक्यात असताना हा साधा निर्णय फार लांबत आहे. बास...
बाबा: तू मला दोन मिनिटाच्या आत सांगितले नाहीस तर मी निघून जाईन मीटिंग ला. पटकन सांग.. तू दुध पिणार आहेस का नाहीस. (ह्याला रागावणे म्हणत नाहीत.)
अनुष्का: बाबा मला जोराचे वा.. करतोय. वडील चुपचाप झोप.
(मी मागून येणाऱ्य गोंगाटाकडे फारसे लक्ष देत नाहीत. काही शब्द निसटते माझ्या कानात घुसातातच. "काम" "काम" "काम" "बायको" "मुलगी" "लक्ष" "उगाच" "ओरडू" असे काहीसे ते असतात. त्यातून अनुष्काने वडील चुपचाप झोप अशी order सोडलेली असते. बाहेर offshore team कडून आलेला call तिसर्यांदा वाजत असतो.)
बाबा: हो रे लाडू. तू दुध पिणार आहेस का नाहीस? मला मीटिंग ला जायचे आहे. 
अनुष्का:  अनुष्का दुध काळ्या कप नि पिते straw घालून.
(माझी उरली सुरली सहनशक्ती संपते. offshore team कडून आलेला call चौथ्यांदा वाजत असतो. ) मी उठतो आणि दुधाचा अर्धा भरलेला कप घेऊन येतो. अनुष्काला म्हणतो... हे दुध मी बेड जवळ ठेवत आहे. प्यावेसे वाटले तर मला सांग (स्वगत: नाहीतर रात्री call झाल्यावर मीच पिऊन टाकेन. ) नाहीतर झोपून जा. उद्या सकाळी  break fast करताना पी. अनुष्का ला पटत.

दिवस दुसरा. वेळ सकाळी आठ. Business  unit बरोबर मीटिंग चालू झाली आहे. जगभरातून त्या  Business unit   चे  लोक  कंपनी  च्या  पैशांनी  मजा  करायला  आलेले  असतात.  Weather , गोल्फ, वगैरे चकाट्या पिटून झाल्यावर मी विषयाला सुरुवात करतो. "ह्या Business  product च्या implementation साठी क्रेडीट कार्ड payment चा वापर होणार आहे का? (जर होणार असेल तर माझ्या team ला त्याप्रमाणे काम करावे लागणार होते. आणि ती गोष्ट आधीच्या plan प्रमाणे नव्हती.)
John : आमचे product जग भरातून जास्त करून पूर्व आशिया आणि उत्तर अमेरिकेतून खरेदी होते. पण अनेक लोक त्या ठिकाणच्या office मध्ये जाऊन ते खरेदी करतात.
मी: पण असे  कधी घडते का की product विकत घेणाऱ्याला क्रेडीट कार्ड चा वापर करावा लागेल?
John : ते accounting operations ला विचारावे लागेल.
मी: आज आपल्या ह्या मीटिंग मध्ये  accounting operations  कडून Mr  Peter आले आहेत. आपण त्यांचे मत जाणून घेऊ या.
Perter : Accounting operation team अनेक माध्यमातून आलेले वित्त त्याच्या प्रकाराप्रमाणे आणि त्या त्या ठिकाणच्या कायद्यांप्रमाणे वर्गीकृत केले जाते. क्रेडीट कार्ड संबंधी आमचे काहीही वेगळे नियम नाहीत.
Mary (काहीही विचारलेले नसताना): अनेकदा असे होते की आमच्या कडे जग भरातील office मधील सर्व उलाढाली paper report म्हणून  येतात आणि मग आम्ही त्या accounting program मध्ये टाकतो.
मी: पण ह्या सर्व प्रक्रियेमध्ये, आपण आज ज्या system बद्दल बोलत आहोत त्यासाठी क्रेडीट कार्ड चा वापर होणार आहे का?
मार्केटिंग प्रमुख David : ह्या product कडून खूप अपेक्षा आहेत. पहिल्या तिमाहीत आम्ही जवळपास दोनशे मिलियन चे टार्गेट ठेऊन आहोत आणि त्यापेक्षा आक्रमक आमची पुढील वाटचाल असेल.
:
:
:
:
:
(माझा संयम हळू हळू संपत चाललेला आहे. ह्या मीटिंग मधून अजून खूप सारे निर्णय घायचे आहेत आणि चर्चा होत असलेला विषयासाठी केवळ दोन मिनिटाचा वेळ ठेवलेला होता.)
मी: पण मला आजून कोणताच निर्णय कळलेला नाही. आज विषयांवर निर्णय झाला नाही तर संपूर्ण प्रोजेक्ट रखडेल.
Product प्रमुख Mr. स्मिथ: आम्हाला नेहमीच माहिती तंत्रज्ञान (IT ) कडून सहकार्य मिळत नाही. आमच्या खूप अपेक्षा आहेत ह्या Product बद्दल. उच्च व्यवस्थापन खूप लक्ष ठेऊन आहे. (थोडक्यात IT वाले वा... करत आहेत.  )
(उच्च व्यवस्थापनाकडून आलेले काहीसे माझ्या कानात घुमू लागतात: "प्रोजेक्ट रखडून चालणार नाही नाहीतर सारे माहिती तंत्रज्ञान विभाग बंद करावा लागेल.....".माझी उरली सुरली शक्ती संपते. मला रात्रीची co-operate न करणारी अनुष्का आणि तिला ओरडल्यामुळे माझ्यावर ओरडणारी बायको आठवते आणि माझ्या गालावर हसू फुटते. आता काय बोलावे ते मला नक्की माहित आहे ....
मी: ठीक आहे. मी माझ्या team  कडून क्रेडीट कार्ड processing चा प्रोग्राम तयार करतो. त्यासाठी आपल्याला थोडे पैसे जास्त खर्च करावे लागतील. तुम्हाला  क्रेडीट कार्ड processing  हवे असेल तर मला सांगा नाहीतर ह्या वर्षात आपली १० products जाणार आहेत त्यांना ह्याची जरूर नक्की असेल.
आणि सर्वांना हा पर्याय पटतो...

Sunday, January 23, 2011

Social Networking

मी अतिशय social मनुष्य आहे.
एका अंधाऱ्या शेवाळलेल्या गुहेच्या पोटातून मी सतत updates पाठवत असतो.
अशाच अनेक काळोख्या गुहेतून रहात असलेल्या समाजाच्या मी सतत contact मध्ये मी असतो म्हणून मी social.
 
माझी मुलगी कधी आणि किती मोठी झाली हे मला माहित नसले तरी ती आत्ता काहीतरी करत आहे हे मला माहित आहे.
माझे आई वडील निश्चित जिवंत आहेत कारण फक्त १० सेकंद पूर्वी मी त्यांचा update वाचला जिवंत असण्याचा.
बायको कशी दिसते हे मला नक्कीच आठवते आहे कारण ४ सेकंद पूर्वी मी तिला सुंदर फोटो असा comment टाकला होता.
अंतरीची ओळख पटली नाही काय हरकत आहे? मी कोणालाही tag करू शकतो.
 
ह्या वेगात धावणाऱ्या जगात मला तुमच्या सर्वांशी जवळून नाती टिकवायची आहेत
म्हणून मला दर चतकोर second नी update देऊ शकणाऱ्या यंत्रासाठी मला अजून जोरात धावणे भाग आहे.
 
ह्या सर्व गोष्टीत फक्त एका गोष्टीने मी अस्वस्थ आहे.
ह्या काळोख्या गुहेमध्ये कितीतरी दिवसात सूर्य नाही दिसला.
पावसाचे टपोरे थेंब नाही झेलले की बेफाम वाऱ्याचा आनंद नाही घेतला.
 
एक weather channel subscribe करेन म्हणतो...

Saturday, December 11, 2010

हादडण्यासाठी जन्म आपुला - bachelor style चे butter Chicken

आज आपण bachelor  style  चे butter Chicken बनवायला शिकू या. ते चहा किंवा टोमाटो चे सार बनवण्याइतके सोपे नक्कीच नाही. बायको माहेरी गेल्यावर, प्रोजेक्ट मुळे डोके फिरल्यावर, जेव्हा खाणे हा आयुष्यातील एकमेव आनंद आहे असे वाटू लागते तेव्हा बनवायला हा खूप चांगला पदार्थ आहे. तो बनवताना वेळ बराच जातो त्यामुळे डोके दुसऱ्या विचारात गुंतते आणि वेळ सुरेख जातो. नंतर गरमागरम chicken मित्रांसोबत हाणताना आणि बरोबर थंडी घालवण्याचे पेय असताना उरलेला वेळ आणखी चांगला जातो.
दुसऱ्या दिवशी तेच chicken ब्रेड मध्ये भरून sandweech बनवता येते नाहीतर पोळीमध्ये भरून काठी रोल बनवता येतो. ह्याने दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता उठल्यावर काय खाऊ असा प्रश्न पडत नाही आणि आणखी २ नवे पदार्थ आपण blog वर टाकायला मोकळे.

पूर्वपूर्वतयारी: हा पदार्थ बायको / आई घरात नाही हे पाहूनच बनवावा. हा पदार्थ बनवताना आपल्याला अनेक ओली वाटणे बनवायला लागतात आणि त्यामुळे सगळा ओटा खराब होऊ शकतो. बायकोने हे बघितले तर ती झाडूने मारू शकते. तसेच इतकी भांडी कशासाठी, हे काय करून ठेवले, माझ्या आवडत्या भांड्यावर चरा कसा  पडला  अशा  भुक्कड  प्रश्नांना  तुम्हाला  उत्तरे  द्यावी  लागत नाहीत.    
जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल आणि तुम्ही बायकोला खूष करण्याचा प्रत्येक क्षणाला प्रयत्न करत असाल तर बायकोला ह्या पदार्थाची recepie विचारा आणि बायको बडबड करत आहे हे बघून अर्धा तास झोप काढा. अर्ध्या तासाने बरोबर असेच करेन असे म्हणून तुमची recepie  बनवायला सुरुवात करा. 
पूर्वतयारी: प्रत्येक खाणाऱ्या डोक्याला २०० ग्रॅम ह्या हिशोबाने बोनलेस चीकेन आणा. ते स्वच्छ धुवा. अतीस्वच्छतेला पर्याय नाही. ह्या वाक्याने तुमची कितीही चिडचिड होत असली तरी त्याला खरच पर्याय नाही. मिक्सर मध्ये मुठभर कोथिंबीर, आल्याचा मोठा तुकडा, त्याच्या साधारण दुप्पट लसुण, भरपूर मिरच्या टाका. साधारण २०० ग्रॅम चीकेन ला २ तिखट मिरच्या, ८ लसुण पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा पुरतो. मला माहित नाही कि तुम्ही किती मित्रांना हाणायला बोलावले आहे आणि त्यातील किती लोक नॉनव्हेज खातात. त्यामुळे त्या हिशोबाने हे वाटण बनवा. तुम्ही जर स्वयंपाक घरात आज पहिल्यांदाच गेला असाल खाणे बनवण्यासाठी (तर खरे तर हा पदार्थ बनवूनच नका. चहा, लिंबू चहा नाहीतर टोमाटो सूप बनवा) तर वाटण बनवण्यासाठी मिक्सर चालू करावा लागतो हे लक्षात असू द्या.

स्वच्छ चिकन चे छोटे तुकडे करा आणि त्याला हे वाटण चोळा. चवीपुरते मीठ घाला. २०० ग्रॅम चिकन ला दोन चमचे ह्या हिशोबाने दही घाला आणि थोडे लिंबू वरून पिळा. लिंबाची बी चिकन मध्ये पडत नाही ह्याची खात्री करा. लिंबाच्या बियांनी सारा पदार्थ खूप सहजपणे बिघडू शकतो. थोडीशी काश्मिरी लाल मिरची घाला. ह्याने खूप सुंदर नैसर्गिक रंग येतो. एक ओव्हन चे मोठे भांडे घेऊन त्यात aluminium फोइल टाका. त्यात चिकन चे सर्व तुकडे रांगेने मांडा. एका वाटीत थोडे  butter   पातळ करून घ्या आणि एका ब्रश ने ते चिकन च्या तुकड्यांना लावून ओव्हन मध्ये ठेवा. मधून अधून थोडे थोडे butter चिकन च्या तुकड्यांना लावत राहा. आणि ते हलके ब्राऊन होण्याची वाट बघा. ह्या प्रकारात १.५ ते २ तास जाऊ शकतात.
कांदा चिरून घ्या. टोमाटो ची प्युरी बनवून घ्या. २०० ग्रॅम चिकन साठी साधारण १ कांदा आणि २.५ टोमाटो पुरेल. अर्धा टोमाटो स्वयंपाक करता करता खाऊन टाका.
कृती: थोडे बटर एका मोठ्या fry  pan मध्ये टाकून त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्या. त्या मध्ये थोडा तंदूर चिकन मसाला टाकला तर अजून मजा येते. त्यानंतर टोमाटो प्युरी टाका आणि ते मिश्रण चांगले परता. ग्रेवी बनल्यावर त्या मध्ये हलके ब्राऊन झालेले चिकन टाका आणि थोडे परत हलवून घ्या. चवी पुरते मीठ टाका आणि साखर टाका. चिकन च्या डिश मध्ये साखर टाकणे कितीही गमतीदार वाटत असले तरीही थोड्याश्या साखरेने फार सुंदर चव येते.
सजावट: हे चिकन आपल्या बायकोने भिशी साठी बनवले नसून आपण आपल्या उडानटप्पू मित्रांसाठी बनवले आहे हे लक्षात ठेवावे. त्यामुळे चिकन चा हत्ती केला, मागे हिरवळ म्हणून किसलेला कोबी टाकला वगैरे प्रकार करू नयेत. पोटात थंडीसाठी जरुरी असलेले पेय गेल्यावर गरम गरम चिकन पटापट plate मध्ये घेऊन मस्त हादडावे.
आस्वाद आणि चिंतन: आस्वाद हा हादडणे ह्या शब्दाचा समानअर्थी शब्द आहे. आणि इतके सुंदर चिकन हादडायचे सोडून येड्यासारखे चिंतन करत बसले तर चिकन गार नाही का होणार. चिकन कसे झाले आहे who cares . मित्रांबरोबर संध्याकाळ मजेत गेली आणि चिडचिड कमी झाली thats it .
पौष्टिकता: Again who cares . आयुष्यात इतकी सगळी टेन्शन्स असताना हा पदार्थ किती पौष्टिक ह्याचे अजून टेन्शन कशाला घ्यायचे? हा पदार्थ बनवण्याआधी मस्त जिम मध्ये जाऊन ६०० कॅलाऱ्या उडवल्या कि झाले. ह्या पदार्थात अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स म्हणून वा वा म्हणायचे आणि α-carotene नाही म्हणून छोटेसे तोंड करून बसायचे ... का??? कशासाठी???

Saturday, December 4, 2010

अनुष्का कडून शिकलेल्या गोष्टी - Part 1

गेल्या दोन तीन वर्षात कामानिमित्त परदेशात जाणे झाले. त्यामुळे खूप फिरणे, वेगवेगळ्या जागांना भेट देणे भटकणे या गोष्टी ओघाने आल्याच. या आधी भटकताना मी आणि बायको असे दोघेच हिंडत असल्याने Bachelor style नी हिंडत होतो. पण नंतर अनुष्का, आमची मुलगी, लहान असल्याने खूप planning करून हिंडावे लागत होते. कुठेही जायचे तरी २ -३ महिने त्याचे planning चाले. Tickets ,Hotels चे  बुकिंग, सामानही बांधाबांध वगैरे.एकदा सहज विचार करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मी अनुष्काच्या नजरेने पाहायला सुरुवात केली.

एक दिवस अनुष्काला सकाळी खूप लवकर जाग आली तर ती bed मध्ये झोपण्या ऐवजी तिच्या कार-seat मध्ये बसलेली होती. शेजारी तिची मम्मी बसली होती आणि बाबा driving करत होता. अनुष्काला काहीही फरक नाही पडला. ती थोड्या वेळाने परत झोपून गेली. तिला  जेव्हा जाग आली तेव्हा ती विमानत बसलेली होती. पण त्याचेही  तिला काही वाटले नाही. तिने शांतपणे समोर पडलेले magzine  उचलले आणि त्यातील चित्रे बघायला सुरुवात केली.

एकदा अनुष्काची झोपमोड झाली ती पाण्याच्या तुषारांमुळे.  अनुष्काने झोपेतून डोळे उघडले तर समोर पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह कोसळत होता. आम्ही सगळे Niagara ला गेलो होतो आणि छोट्याश्या बोटीतून धबधब्याच्या आगदी जवळ गेलो होतो. आमचे डोळे फिरत होते. अनुष्काला मजा आली. तिला पाण्यात खेळायला खूप आवडते. तिने स्वतःची जीभ बाहेर काढली आणि ते उडणारे तुषार ती झेलत बसली.

ह्या एप्रिल मध्ये आम्ही लास वेगास आणि Grand Canyon ला गेलो होतो. अनुष्काच्या Routine मध्ये काहीही फरक पडला नाही. तिला भूक लागली तेव्हा ती जेवली. झोप आली की ती झोपली. हाच pattern परत परत repeat झाला. अनुष्का ने झोपेतून डोळे उघडले ते कधी लास वेगास च्या हॉटेल चा रूम वर तर कधी Grand Canyon च्या प्रचंड कड्याच्या टोकावर. परक्या पण खूप रंगीबेरंगी रूम मध्ये तिला काहीवेळा मजा आली. काहीवेळा  त्या परक्या वातावरणाचा तिच्यावर काहीच फरक पडला नाही. Grand Canyon च्या प्रचंड कड्यावर तिचे डोळे फिरले नाहीत की आपण उडून गेलो तर... आशी भीती वाटली नाही.  तिने जीभ बाहेर काढली आणि येणारा गार वारा  जिभेवर झेलून त्याचा आनंद घेतला.

जागा बदलल्या, वेळा बदलल्या पण डोळे उघडले की आपण कुठेही असू शकतो त्या pattern मघ्ये काहीच फरक पडला नाही. आणि त्याच्यावर शांत reaction देण्याची अनुष्काची पद्धत पण बदलली नाही.
का नाही बदलली? कारण मला असे वाटते की ह्या प्रत्येक वेळेस तिने जेव्हा डोळे उघडले त्यावेळी ती मम्मीच्या मांडीवर होती किंवा बाबाच्या कडेवर होती. तिला कायम आशी खात्री होती की जोपर्यंत मम्मी आणि बाबा माझ्या जवळ आहेत तोपर्यंत बाकीचे पडणारे फरक काहीच विशेष नाहीत.

आपण पण असेच झोपेतून उठतो आणि आपल्याला दिसते की सगळीकडे प्रचंड Recession आहे आणि आपली नोकरी पण जाऊ शकते. आपण असेच एक दिवस झोपेतून उठतो आणे आपल्याला दिसते की आपला जीवलग खूप आजारी आहेत. एक दिवस आपली झोपमोड होते ती पोटात प्रचंड पडलेल्या खड्ड्यामुळे... आणि तो खड्डा पडलेला असतो तो महिन्यात अनपेक्षित झालेल्या आणि होऊ घातलेल्या खर्चाने. 

पण ह्या सगळ्या वेळेस आपल्या बरोबर देव आहे, आपले हितचिंतक / आपले लोक आहेत. अनेकांचे आशीर्वाद आहेत हे लक्षात घेऊन ह्या बदलांना आपण अनुष्का सारखी शांत reaction का देत नाही?