Pages

Saturday, October 8, 2011

अनुष्का कडून शिकलेल्या गोष्टी. - Part ३

अनुष्का कडून शिकलेल्या गोष्टी.  - Part  ३

आणि अनुष्का चा नवीन बेड आला. अनेक दिवसांपासून असलेला एक प्रश्न सुटला. 

नवीन बाळ घरी येणार म्हणून झोपण्याच्या व्यवस्थेत काही तरी बदल करावा लागणारच होता. पण तो बदल कसा करावा हे अनेक दिवस ठरवता येत  नव्हते. प्रथम आम्ही विचार केला की एक बाळासाठी छोटा बेड आणावा. पण तो काही फार दिवस वापरता आला नसता. बाळाला थोडे कळायला लागल्यावर ते काही एकटे एका बेड वर नक्कीच नसते झोपले आणि अनुष्का साठी नवीन बेड घेणे म्हणजे तिला उगाचच वाटत राहिले असते के बाळ  आल्यावर आपण आई बाबा पासून दूर गेलो. आहे तो बेड चार जणांसाठी नक्कीच पुरला नसता. ह्या सर्वातून मार्ग काढण्यासाठी अनुष्कालाच विचारले की तिला दुसऱ्या बेड वर झोपायला आवडेल का? तिला हे पण सांगितले कि तो बेड जरी वेगळा असला तरी तो आपण नेहमीच्या बेड च्या शेजारी ठेवू.

आमची अपेक्षा होती की अनुष्का ला समजवावे लागेल, किंवा बाळ आल्यावर काही दिवस बाळाला नवीन बेड वर झोपवावे लागेल पण ह्या सर्व गोष्टींना छेद देऊन अनुष्का फारच लगेच तयार झाली आणि इतकेच नाही तर त्याची स्वप्न बघू लागली. तिला वोल्ट डिस्ने चे कार्टून्स खूप आवडतात त्यामुळे बेड आल्यावर आपण त्यावर तश्या कार्टून्स ची चादर घालू, बेड सजवू अशा कल्पनांमध्ये रंगून गेली.

शेवटी थोड्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बेड आला आणि अनुष्का फारच खुश झाली. आम्ही बेड नीट लावला आणि त्यावर अनुष्का ला आवडतील अशी चादर, उशी चे कव्हर, रजई घातली आणि अनुष्काला दाखवला. बेड फारच चांगला लागला. लांबून बघितल्यावर तो आमच्याच बेड का एक भाग वाटत होता. तसाच आकार, तशीच उंची त्यामुळे तो वेगळा बेड वाटतच नव्हता. पण तरीही आमचा बेड आणि नवीन बेड ह्यामध्ये अर्धा इंच उंचीचा फरक होता. त्यामुळे जरी तो बेड एकाच वाटत असला तरी अनुष्काचा बेड ला स्वतःचे अस्तित्व होते. 

रात्र झाली. आज अनुष्का त्या बेडवर पहिल्यांदा झोपणार होती. आता बघू ती काय करते अशा विचाराने आम्ही झोपायला गेलो. अनुष्काचा उत्साह तसाच राहिला आणि ती मजेत स्वतःच्या बेड वर झोपून गेली. 
ती झोपल्यावर मला आतिशय चुटपूट लागली. ती नवीन बेड वर झोपू शकेल का ह्याचा विचार करता करता
मी एकटा झोपू शकेन का हा विचार मनात आलाच नव्हता.  अनुष्का रोज आमच्या मध्ये झोपायची, वाटेल तशी लोळायची आणि मला एका कोपऱ्यात ढकलायची ह्या आरामापुढे आज ह्या बेड वर ऐसपैस झोपण्यात मजाच येई ना. मनात विचार आला की तिच्या आणि आमच्या सहजीवनातील एक भाग संपला. अनुष्का थोडी अजून मोठी झाली.

त्या रात्री खूप वेळ झोप लागली नाही. रात्री उशिरा अनुष्का चा आवाज आला. अनुष्का झोपेतच होती आणि मला जवळ घ्यायला सांगत होती. मी हात पुढे केला आणि तिला थोपटले. तिला लगेच झोप लागली.

मनात विचार आला की लांब, जवळ ह्या गोष्टी सापेक्ष आहेत. काळाप्रमाणे, मोठे होण्याच्या प्रोसेस मध्ये लांब जाणे हि गोष्ट अपरिहार्य आहे. पण तरीही काहीही फरक पडत नाही. गरज असेल तेव्हा जवळ हात पोहोचला म्हणजे झाले.


3 comments:

  1. नेहमी प्रमाणे अतिशय सुन्दर आणि खूपच टची झाला आहे.तुला खरच खूप सुरेख आणिअतिशय साध्या भाषेत छान लिहिता येते तर लिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहित रहा वाचक खूप उत्सूक आहेत. ममा

    ReplyDelete
  2. हात पोचवणे ही आई-वडिलांची गरज आहे. बंगळुरूपर्यंत हात पोचत होता. आता पोचत नसेल तर काय करायचं?
    असं भावनिक लिहिणं हा माझा स्वभाव नाही. मी म्हातारा व्हायला लागलो असा त्याचा अर्थ आहे. पण अनुष्का मोठी झाली, तसा तू मोठा झालास, तसं मलाही मोठं व्हायला आणि शिलायला पाहिजेच की!
    दर वेळा मनातलं बोलता येतंच असं नाही. अशा वेळी लिहिणं हाच चांगला (एकमेव नव्हे) मार्ग आहे.

    ReplyDelete
  3. You write great! Where did you start and where it ended ...you started it to write and God / Destiny ended it. Very touchy - I was thinking that I am mastering this but you are too many steps ahead. Thinking is one thing but writing great in simple language is another. Not a word here or there. Now comes difficult part - as Mamaa said, make it a habit to write as if considering that you must for if you don't write, then who will? There are many people in this world who may take your place in your earning profession. But you are the only one to write in the style as above and also with extremely rich content.

    ReplyDelete