Pages

Wednesday, December 27, 2017

अनुष्का आणि साया बरोबर शिकलेल्या गोष्टी - Toilet Fight

भावंडांमध्ये भांडणे झाली नाहीत असे होणे शक्यच नाही. छोट्या छोट्या अनेक कारणांसाठी भांडणे. लहानपणी मी आणि माझ्या बहिणीने अनेक छोट्या छोट्या भांडणांमध्ये तास अन तास खर्ची घातले आहेत आणि त्यावरून बोलणी पण खाल्ली आहेत. माझी आजी  कधी म्हणाली की किती भांडता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून, की मी लगेच म्हणायचो की असेच छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करावे. त्याने बरे वाटते. भांडणाची खूमखूमी कमी होते आणि काही फारसे नुकसान पण होत नाही. नाहीतर भावंडं वर्षानुवर्ष कोर्ट मध्ये भांडतात त्यात काय मजा? तर असो. 

अनुष्का आणि साया पण ह्याला अपवाद नाहीत. "ती मला असा का म्हणाली,  तिने मला का चिडवले, तिने मला बोट का लावले, तिने माझा सॉक्स का पळवला " ह्या मुद्यांकडे मी तर सरळ दुर्लक्ष करतो (म्हणजे फारच बायकोचा आरडाओरडा झाला तर जाऊन जरा ओरडल्यासारखे करतो पण मी आणि मुली ते काही फार सिरिअसली घेत नाही). पण ह्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी हताश होतो. ती म्हणजे बाथरूम ला पहिले कोण जाणार ह्याची fight. 

घरात ३ बाथरूम आहेत. सर्व सारख्याच स्वच्छ आणि चकचकीत आहेत. कोणत्याही बाथरूम मध्ये जाण्यासाठी मी वेगळे तिकीट चार्जे करतो असे नाही. हे काही सुलभ शौचालय नाही की एक रुपया टाकून आपल्या नंबर साठी तलवार काढावी. पण तरीही ह्याच्यासाठी रोज भांडण. आता बाथरूम ला सर्वांना एकदम जावे लागते अशीही  काही परिस्थिती नसते पण अनुष्का कधीही म्हणाली की मी बाथरूम ला जाते की साया हातातले काम टाकून मी आधी जाणार म्हणून येणारच. त्यानंतर दोघींपैकी कोणीतरी कोणत्या बाथरूम मध्ये जायचे ते ठरवणार आणि मग युद्धाला सुरुवात. अनेकदा ठरवलेली बाथरूम जगाच्या दुसऱ्या टोकाला असणार, मग मधले अडथळे ओलांडीत, तुडवीत दोघीही पळणार. जिन्यामध्ये ढकलाढकली करणार. एकमेकींचे केस ओढणार. बाथरूम चे दार ढकलत मारामारी करणार. आता कोणीतरी एकजणच एका वेळेस जाऊ शकणार मग हरलेली पार्टी रडारड करणार. जिंकलेली पार्टी आनंदात आपले काम उरकण्यापेक्षा धापा टाकत बसणार. मनात कुठेतरी guilt feeling असणार. वगैरे वगैरे. मग आमचे आवाज चढणार, आरडा ओरडा होणार. मी बायको वर आणि बायको माझ्यावर चिडणार (कारण मी proactively भांडणे का मिटवली नाहीत असा बायकोचा साधा हिशोब आणि मला १० कामे आहेत. ते सर्व सोडून आता टॉयलेट ट्रीटी मध्ये माझा वेळ घालवू का असा माझा सरळ हिशोब. )

इतकं सर्व करून मुलींना काय मिळाले ह्याचा मी अनेकदा विचार केला आहे. पहिल्यांदा बाथरूम पकडणाऱ्याला मी काही "बाथरूम चा राजा " किंवा "टॉयलेटकेसरी " असा 'किताब देणार नसतो. महिन्यात जास्तीतजास्त वेळा पाहिलांदा बाथरूम मध्ये कोण गेले ह्यासाठी मी काही बक्षीसही  ठेवलेले नसते. पहिल्यांदा बाथरूम मध्ये गेलेली मुलगी आवडती आणि बाहेर राहिली ती नावडती असेही काही नसते. किंबहुना अश्या fight नंतर दोघी मुली ओरडूनच घेतात. मग सर्वस्व पणाला लावून टॉयलेटभूषण बनण्याची ही कसली आवड? आणि मग लक्षात आले की ही टॉयलेट fight तर सर्वत्रच दिसते आहे.

सकाळी झोपेतून उठले आणि whatsapp चेक केले की काही जण "A" चांगला का "B" ह्यावर भांडत असणार. हे "A" आणि "B" राजकारण, सिनेमा, धर्म वगैरे वगैरे काहीही असणार. पाने च्या पाने वाया जाणार, इंटरनेट कचरा तयार होणार, आणि का? तर काही कारण नाही. General Toilet Fight .

घरातून निघून रस्त्यावर जावे तर सर्वजण race मध्ये असणार. सिग्नल वरून कोण पहिला निघतो त्यावरून fight.

फर्स्ट डे फर्स्ट शो नाही बघितला तर जग आपल्याला backward म्हणणार ह्या भीतीने केलेला लढा

ऑफिस मध्ये मी सर्वात उशिरा निघतो (उगाचच) आणि म्हणून मीच सर्वात जास्त hardworking हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न.

खूप भारी फोन येणार आणि तो घेतला नाही तर माणसांमधील संवादच संपणार अश्या उदात्त भावनेने आपल्याला परवडत नसून रात्र रात्र रांगेत उभे राहण्याचा आग्रह.

यादी संपणार नाही. वाचणारा प्रत्येक जण अजून १० तरी ऍडिशन्स करेल.  

थोडक्यात म्हणजे धावा, अजून जोरात धावा, Social Media वरचे आभासी ससे race जिंकत आले आहेत त्यांना मागे टाकलेच पाहिजे. ह्या जगात राहण्यासाठी अजून जोरात धावले पाहिजे.

मला वाटते ह्या सर्व आपल्या आयुष्यातल्या Toilet Fights आहेत. ह्या वाटेने पुढे गेले तर टॉयलेटशिरोमणी हा 'किताब सोडून दुसरे काही मिळेल असे वाटत नाही. 

No comments:

Post a Comment