आज आपण bachelor style चे butter Chicken बनवायला शिकू या. ते चहा किंवा टोमाटो चे सार बनवण्याइतके सोपे नक्कीच नाही. बायको माहेरी गेल्यावर, प्रोजेक्ट मुळे डोके फिरल्यावर, जेव्हा खाणे हा आयुष्यातील एकमेव आनंद आहे असे वाटू लागते तेव्हा बनवायला हा खूप चांगला पदार्थ आहे. तो बनवताना वेळ बराच जातो त्यामुळे डोके दुसऱ्या विचारात गुंतते आणि वेळ सुरेख जातो. नंतर गरमागरम chicken मित्रांसोबत हाणताना आणि बरोबर थंडी घालवण्याचे पेय असताना उरलेला वेळ आणखी चांगला जातो.
दुसऱ्या दिवशी तेच chicken ब्रेड मध्ये भरून sandweech बनवता येते नाहीतर पोळीमध्ये भरून काठी रोल बनवता येतो. ह्याने दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता उठल्यावर काय खाऊ असा प्रश्न पडत नाही आणि आणखी २ नवे पदार्थ आपण blog वर टाकायला मोकळे.
पूर्वपूर्वतयारी: हा पदार्थ बायको / आई घरात नाही हे पाहूनच बनवावा. हा पदार्थ बनवताना आपल्याला अनेक ओली वाटणे बनवायला लागतात आणि त्यामुळे सगळा ओटा खराब होऊ शकतो. बायकोने हे बघितले तर ती झाडूने मारू शकते. तसेच इतकी भांडी कशासाठी, हे काय करून ठेवले, माझ्या आवडत्या भांड्यावर चरा कसा पडला अशा भुक्कड प्रश्नांना तुम्हाला उत्तरे द्यावी लागत नाहीत.
जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल आणि तुम्ही बायकोला खूष करण्याचा प्रत्येक क्षणाला प्रयत्न करत असाल तर बायकोला ह्या पदार्थाची recepie विचारा आणि बायको बडबड करत आहे हे बघून अर्धा तास झोप काढा. अर्ध्या तासाने बरोबर असेच करेन असे म्हणून तुमची recepie बनवायला सुरुवात करा.
पूर्वतयारी: प्रत्येक खाणाऱ्या डोक्याला २०० ग्रॅम ह्या हिशोबाने बोनलेस चीकेन आणा. ते स्वच्छ धुवा. अतीस्वच्छतेला पर्याय नाही. ह्या वाक्याने तुमची कितीही चिडचिड होत असली तरी त्याला खरच पर्याय नाही. मिक्सर मध्ये मुठभर कोथिंबीर, आल्याचा मोठा तुकडा, त्याच्या साधारण दुप्पट लसुण, भरपूर मिरच्या टाका. साधारण २०० ग्रॅम चीकेन ला २ तिखट मिरच्या, ८ लसुण पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा पुरतो. मला माहित नाही कि तुम्ही किती मित्रांना हाणायला बोलावले आहे आणि त्यातील किती लोक नॉनव्हेज खातात. त्यामुळे त्या हिशोबाने हे वाटण बनवा. तुम्ही जर स्वयंपाक घरात आज पहिल्यांदाच गेला असाल खाणे बनवण्यासाठी (तर खरे तर हा पदार्थ बनवूनच नका. चहा, लिंबू चहा नाहीतर टोमाटो सूप बनवा) तर वाटण बनवण्यासाठी मिक्सर चालू करावा लागतो हे लक्षात असू द्या.
स्वच्छ चिकन चे छोटे तुकडे करा आणि त्याला हे वाटण चोळा. चवीपुरते मीठ घाला. २०० ग्रॅम चिकन ला दोन चमचे ह्या हिशोबाने दही घाला आणि थोडे लिंबू वरून पिळा. लिंबाची बी चिकन मध्ये पडत नाही ह्याची खात्री करा. लिंबाच्या बियांनी सारा पदार्थ खूप सहजपणे बिघडू शकतो. थोडीशी काश्मिरी लाल मिरची घाला. ह्याने खूप सुंदर नैसर्गिक रंग येतो. एक ओव्हन चे मोठे भांडे घेऊन त्यात aluminium फोइल टाका. त्यात चिकन चे सर्व तुकडे रांगेने मांडा. एका वाटीत थोडे butter पातळ करून घ्या आणि एका ब्रश ने ते चिकन च्या तुकड्यांना लावून ओव्हन मध्ये ठेवा. मधून अधून थोडे थोडे butter चिकन च्या तुकड्यांना लावत राहा. आणि ते हलके ब्राऊन होण्याची वाट बघा. ह्या प्रकारात १.५ ते २ तास जाऊ शकतात.
कांदा चिरून घ्या. टोमाटो ची प्युरी बनवून घ्या. २०० ग्रॅम चिकन साठी साधारण १ कांदा आणि २.५ टोमाटो पुरेल. अर्धा टोमाटो स्वयंपाक करता करता खाऊन टाका.
कृती: थोडे बटर एका मोठ्या fry pan मध्ये टाकून त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्या. त्या मध्ये थोडा तंदूर चिकन मसाला टाकला तर अजून मजा येते. त्यानंतर टोमाटो प्युरी टाका आणि ते मिश्रण चांगले परता. ग्रेवी बनल्यावर त्या मध्ये हलके ब्राऊन झालेले चिकन टाका आणि थोडे परत हलवून घ्या. चवी पुरते मीठ टाका आणि साखर टाका. चिकन च्या डिश मध्ये साखर टाकणे कितीही गमतीदार वाटत असले तरीही थोड्याश्या साखरेने फार सुंदर चव येते.
सजावट: हे चिकन आपल्या बायकोने भिशी साठी बनवले नसून आपण आपल्या उडानटप्पू मित्रांसाठी बनवले आहे हे लक्षात ठेवावे. त्यामुळे चिकन चा हत्ती केला, मागे हिरवळ म्हणून किसलेला कोबी टाकला वगैरे प्रकार करू नयेत. पोटात थंडीसाठी जरुरी असलेले पेय गेल्यावर गरम गरम चिकन पटापट plate मध्ये घेऊन मस्त हादडावे.
आस्वाद आणि चिंतन: आस्वाद हा हादडणे ह्या शब्दाचा समानअर्थी शब्द आहे. आणि इतके सुंदर चिकन हादडायचे सोडून येड्यासारखे चिंतन करत बसले तर चिकन गार नाही का होणार. चिकन कसे झाले आहे who cares . मित्रांबरोबर संध्याकाळ मजेत गेली आणि चिडचिड कमी झाली thats it .
पौष्टिकता: Again who cares . आयुष्यात इतकी सगळी टेन्शन्स असताना हा पदार्थ किती पौष्टिक ह्याचे अजून टेन्शन कशाला घ्यायचे? हा पदार्थ बनवण्याआधी मस्त जिम मध्ये जाऊन ६०० कॅलाऱ्या उडवल्या कि झाले. ह्या पदार्थात अॅंटी-ऑक्सिडंट्स म्हणून वा वा म्हणायचे आणि α-carotene नाही म्हणून छोटेसे तोंड करून बसायचे ... का??? कशासाठी???